Sunday, January 5, 2025

असंघटित कर्मचाऱ्याचे व्यावसायिक आरोग्याची एक झलक, अनेक पैलू




अलीकडे सामाजिक स्वास्थ्याच्या बारकाव्या, त्याचे अनेक पैलू लपवल्या, लपल्या जातात पण शर्मीलाजी सारखे पत्रकार त्याचे उजागर करतात ही जमेची बाजू! आजच्या पत्रकार दिना निमित्ताने या बाबतीत ब्लॉग करण्याची गरज वाटली सकाळी ४ वाजता. अशी निर्भीड, तटस्थ पण संवेदनशील पत्रकारिता काय करू शकते हे सांगायची गरज नाहीं. 

या लेखावर मी प्रतिसाद या ब्लॉग च्या नंतर मी शेअर केलेय.

----------++-------------##########------------++----------

 #खुर्ची - शर्मिला कलगुटकर - एक संवेदनशील पत्रकार चे Facebook पोस्ट

स्टेशनमध्ये लोकल आली की तिचा वेग कमी व्हायच्या आत धडाधड उड्या पडतात. त्यातल्या कितीजणींना विंन्डो सीट मिळते अन् हातातला मोबाईल बाजूला ठेवून कितीजणी मागेमागे पडत जाणारी स्टेशन्स, तिथून दिसणारी हलती झाडं, आपल्यापासून मागे जाणाऱ्या इमारती पाहतात कुणास ठाऊक..पण तरीही ही धडपड जागा मिळावी म्हणून असते. ज्यांना जागा मिळत नाही त्यांचा आतमध्ये कुर्ला, घाटकोपर, दादर असा कुठे उतरणार यासाठी गलका सुरु असतो. 

कामानिमित्त पायपीट करून पुन्हा परत येतानाही काहीवेळा मला उभं राहून प्रवास करावासा वाटायचा. ते दिवस लोकलमध्ये कायम तुडुंब गर्दी नसल्याचे होते. आता श्वास घ्यायला जागा नसते त्यामुळे जिवाला पुन्हा दमवणं नको वाटतं. सात आठ तास खुर्चीत बसून पद्धतीचं काम असलेल्यांनाही उभं राहून प्रवास नकोच असतो. प्रत्येकीला जागा हवी असते....

काल प्रवासात शेजारी एक एकोणीस वीस वर्षाची मुलगी उभ्यानेच एका पायाने दुसऱ्या पायावर दाब देत होती. मध्येच पाणी पित होती. जास्त त्रास होतोय का, सहज विचारलं तर म्हणाली रोजचं आहे. आता सवय झाली.

 ती एका पार्सल घेणे, त्याची एरिआप्रमाणे विभागणी करणे, ऑनलाइन ऑर्डर आल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग करणे अशा सेवा देणाऱ्या डिलव्हरी सर्व्हिसमध्ये होती. कधी भल्या पहाटेची शिफ्ट तर कधी रात्री उशिरापर्यंतचा मुक्काम. सणासुदीला दिड दिवस तिथेच पडिक..  दिवसभरात अर्धा तास जेवणासाठी ब्रेक.

 नाव खोदून विचारलं तर आमचं खासगी पोस्ट समज. दिवसाला अमुक एक पार्सल तपासण्याचं. ते एरिआप्रमाणे विभागून देण्याचं. लेबल प्रोसेसिंग करण्याचं काम. दिलेल्या टारगेटपेक्षा अधिक झालं तर वर एका पार्सलसाठी सात की आठ रुपये. 

 कॉलेज सांभाळून अनेक मुलं हे काम करतात. कामात अट फक्त एकच बसायला खुर्ची नाही. काम उभ्याने. खाली बसून काम केलं की कामाचा स्पीड कमी होतो म्हणे...

मॉलमध्ये काम करणाऱ्या एका मुलीनेही हेच सांगितलं होतं. मासिक पाळी, पोटात दुखण्याच्या वेळीही खाली बसण्याची व्यवस्था नाही. अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये वॉशरुममध्ये काम करणाऱ्या मुली तिथंच कुठेतरी खाली बसतात. आतमध्ये कुणी आलं की दचकून उभ्या राहतात. ते सगळं आठवलं.

ती म्हणाली. सुरवातीला पाय भरून यायचे, नको वाटायचं. पण ओव्हरटाइम मिळतो. कॉलेज सुरु राहतं. तिचा भाऊ, दुसरी बहिण हे काम करते. एकाने दुसऱ्याला नोकरी लावली की त्या पगारात तीनशे रुपये अधिक येतात. आम्ही तरुण आहोत. कामाचा वेग अधिक आहे. अधिक पार्सल्स लाइनअप करतो. पन्नास- पच्चावन्न झालेले दोघे काका पाठीला पट्टा लावून येतात. स्पीड कमी झाला तर काम जमत नसेल तर जा सांगतात. त्यांना आठ नऊ वर्ष सहज झालीत. आता ते कुठे जातील. तिचा प्रश्न ..

तुझं शिक्षण पूर्ण झालं की हे काम सोडून देशील का, दुसरी नोकरी पाहशील का..सहज विचारलं. 

ती म्हणाली..

कुठे फरक पडतो , काहीजण सतत बसून पाठीची दुखणी मागे लावून घेतात आम्ही उभ्याने.. 

खुर्ची असो, नसो काय फरक पडतोय...

उत्तरासाठी शब्दांची जुळवाजुळव करेपर्यंत उतरून गेली ती..

******

माझे प्रतिसाद:

अनेक कामांचे स्वरूप मुळात जीवघेणं आहेत, मुलींना अत्यंत त्रासदायक. असंघटित क्षेत्र इतका पसरला आहे की ते शोधणे, त्यात दुरुस्ती करणे अशक्यप्राय आहे, दुःखद आहे. तंत्रज्ञानाच्या काळात अश्या समस्या सोडवता येत नाहीं असे नाहीय. पण कॉस्ट कटिंग आणि नफ्याचे मार्जिन वाढवल्या शिवाय असे उद्योग टिकणार नाहीं या भीति किंवा वास्तव्य मुळे असा प्रयत्न कमी प्रमाणात आहे. डॉक्टरी पेश्यात इंडस्ट्रिअल हेल्थ व सुरक्षावर PG करून मोठ्या कॉर्पोरेट ला नोकऱ्या करणाऱ्या आहेत पण occupational health - व्यावसायिक आरोग्य चे नियम व नियमन जवळ जवळ शून्य आहेत. घरकाम करणाऱ्या स्त्रिया,( हाऊसwives सकट), विडी कामगार, packaging, भाजी पोळी डबा पुरवणाऱ्या स्वयंपाकीण, हॉस्पिटल स्वच्छता करणाऱ्या, शहरात कचरा गोळा करणाऱ्या पासून शेतीकाम करणाऱ्या पर्यंत या व्यावसायिक स्त्रिया (पुरुष देखील, पण अनेक कारणांमुळे स्त्रिया विशेषत:) याचे बळी पडतात.  एका अर्थाने  सुप्त लैंगिक हिंसेचे स्वरूप आहे. यात बदल आणणे हा अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे.


No comments:

Post a Comment