Sunday, January 5, 2025

Mega impact of a Nano Revolution

From Sunil Tambe, an FB friend:

मागच्या आठवड्यात म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये गोसीखुर्द प्रकल्पातील चार पुनर्वसित गावांमध्ये गेलो होतो. 

या गावांचं पुनर्वसन नागपूर जिल्ह्यात करण्यात आलं. 

सरकारने शेतजमीन विकत घेतली आणि गावठाणं बनवून दिली. 

विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्त संघटनेने मागणी केली की गावामध्ये जातवार वस्त्या नसाव्यात. लॉटरी पद्धतीने प्लॉट्सचं वाटप प्रकल्पग्रस्तांना करावं. ही मागणी मान्य झाली. 

लेआउट तयार करण्यात आले. प्रशस्त रस्ते झाले. 

प्रत्येक कुटुंबाला ७७५ चौरस मीटरचा प्लॉट मिळाला. 

त्यावर घर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य मिळालं. 

लोकांनी घरं बांधली आणि अंगणात, परसात कांदा, तूर, लसूण, वाल, इत्यादी पिकंही लावली. 

त्याशिवाय पपई, पेरू, केळी, चिकू, आंबा अशी फळझाडंही लावली. 

जुन्या गावात घरं छोटी होती, आसपास मोकळी जमीन नव्हती. आता वर्षाला पुरेल इतका कांदा, लसूण, तूर घराच्या परसात वा अंगणात होते. ताजी भाजी मिळते आणि फळंही भरपूर आहेत, अलका चांदेकर म्हणाल्या (गाव नवेगाव शिरसी, तालुका कुही, जिल्हा नागपूर). 

नव्या गावात कुणबी, बौद्ध, ढिवर, बढई (सुतार) एकमेकांचे शेजारी झाले. 

परिणामी आंतरजातीय विवाहांमध्ये वाढ झाली. 

कुणबी-तेली, कुणबी-बौद्ध, तेली-बौद्ध, गोंड-मुसलमान असे प्रेमविवाह झाले. एकंदरीत किती आंतरजातीय विवाह झाले...

विलास भोंगाडे, प्रकल्पग्रस्त आंदोलनाचे नेते. सुमारे वीस वर्षं चिकाटीने त्यांनी हा लढा सुरु ठेवला त्यामुळे पुनर्वसन मार्गी लागलं. ते म्हणाले, त्यांच्या माहितीनुसार १५० आंतरजातीय विवाह झाले. या जोडप्यांच्या सत्काराचा जाहीर कार्यक्रम त्यांनी केला. 

काही जोडप्यांना भेटलो. 

कुणबी तरुण आणि बौद्ध तरुणी शेजारी होते. मुलगा पदवीधर मात्र पाच एकर शेती करतो. मुलगी बीएससी. सध्या घरी आहे. गरोदर होती. तिला एमएससी करायचं आहे. नवर्‍यालाही वाटतं की तिने पुढे शिक्षण घ्यायला हवं. त्यासाठी तिला नागपूरला जावं लागेल, मुलगा म्हणाला काही हरकत नाही. 

मुस्लिम तरुणीने गोंड मुलाशी प्रेमविवाह केला. तिला तीन मुलं. तिचा एक भाऊ दुबईत असतो तर एक मुंबईत. दुबईतल्या भावाने तिच्याशी बोलणं टाकलं आहे. 

अनेक जोडप्यांनी पळून जाऊन देवळात लग्न केलं. 

पवनीचं कालिमातेचं मंंदिर यासाठी प्रसिद्ध असावं. 

एका जोडप्याने सांगितलं की त्यांनी पळून जाऊन देवळात लग्न केलं. मी विचारलं पवनीला का...

ते म्हणाले हो, तुम्हाला कसं कळलं....

बहुतांश मुलं-मुली स्मार्ट फोनमुळे एकमेकांच्या संपर्कात आले. 

इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादीमुळे. 

त्यावर चॅटिंग करून त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 

घरातल्या लोकांचा विरोध होता म्हणून पवनीला जाऊन लग्न केलं. 

वर आणि वधू मोटरसायकलवरून गेले. त्यांचे आठ मित्र चार मोटरसायकलवरून तिथे गेले. आणि मंदिरात लग्न केलं. 

पुनर्वसित गावांमध्ये आरेसेसची शाखा नाही, राष्ट्र सेवा दलाची शाखा नाही, एआयएसएफ वा एसएफआय या संघटना पोचलेल्या नाहीत. प्रत्येक गावात भीम सैनिक दल वा अन्य आंबेडकरी संघटनेचा बोर्ड दिसला.  

सर्व आंतरजातीय विवाह कालिमातेच्या देवळात पार पडले. 

आंतरजातीय विवाह केलेली अनेक जोडपी परमात्मा एक या संस्था, संघटनेची अनुयायी आहेत. दारावर पाटी असते, दारू पिऊन घरात येऊ नये. 

परमात्मा एक या पंथाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रसार आहे. 

अनेक बौद्ध तरुण-तरुणीही या पंथाचे अनुयायी आहेत.


विविध जातींमध्ये सद्भाव आहे, आंतरजातीय विवाहही होत आहेत. मात्र जातिअंतर्गत विवाहांचं प्रमाण अधिक आहे. खैरे कुणबी आणि बावणे कुणबी यांच्यात रोटी व्यवहार होतो परंतु बेटी व्यवहार होत नाही, असं एका कुणबी गृहस्थाने सांगितलं. 


हा भारत आहे. 

नवीन पंथ उदयाला येतात, टेक्नॉलॉजी विशेषतः शाओमी (स्वस्त स्मार्टफोन) आणि जिओ (स्वस्त डेटा) पार खेडेगावापर्यंत पोहोचली आहे. लोकांच्या वर्तनात स्वागतार्ह बदल होत आहेत. गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स, ग्राम्शी काहीही न वाचलेले तरुण आंतरजातीय विवाह करत आहेत. 

वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या आपले पूर्वग्रह भक्कम करत असतात. त्यांच्या नादी लागून महाराष्ट्रधर्म म्हणजे काय इत्यादी भंकस चर्चा करू नयेत. टेक्नॉलॉजी इज अ ग्रेट इक्विलायझर.

No comments:

Post a Comment